Wednesday, March 4, 2015

ओलाच पसारा ...

(अवेळी पावसाचे बळीराजाने मांडलेले देवाशी भांडण )

का रे भांडतो, असा देवराया
अवेळी सरींची, खेळवून माया

पिकाचा शिमगा, असा अवघ्यात
दूर घास झाला, जरा थोडक्यात

कसुनी माय माझी, पडलो सापड्यात
हिरवे काठ तिचे, अजुनी पापण्यात

उद्याची उजळणी, आज चुकलेली
अंगी दाह आणि, मने मुकलेली

आम्हा पामरांची, उधळूनी रात
कसे राखितो रे, नभी रंग सात

विक्राळ विजांचे, चाळे चाललेले
जणू काही पाश, तूच सोडलेले

कुणा सांगू राया, आशेची कहाणी
उध्वस्त संसाराची, अनोखी रहाणी

पोरक्या नजरांना, कुणाचा आसरा
सुकल्या आसवांचा, ओलाच पसारा....
सुकल्या आसवांचा, ओलाच पसारा....
सुकल्या आसवांचा, ओलाच पसारा....

…… ललित

No comments:

Post a Comment